योजनेचा उद्देश:
महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ज्या उमेदवारांची नवीन कल्पनांच्या माध्यमातून नवउद्योजक बनण्याची इच्छा आहे त्यांना नवव्यवसाय उभारणीस प्रेरणा देणे व मार्गदर्शन करणे.
लाभार्थी लक्षगट:
खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय विभाग / संस्था / महामंडळा मार्फत योजनांचा लाभ मिळत नाही , अशा जातींचे व आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील तरुण नवोद्योजक ज्यांच्या नवनवीन व्यवसाय कल्पनांना अंतिम स्वरूप देवून त्यांच्या नवीन उद्योगांना / व्यवसायास प्रोत्साहन देता येईल असे उमेदवार.
योजनेसाठी अर्ज करण्याची पध्दत:
योजनेसाठी निर्धारित शैक्षणिक व तांत्रिक अटी व शर्तीची पूर्तता करणारे अर्जदार यांनी विहीत नमुन्यामध्ये अमृतच्या किंवा अमृत संस्थेने योजनेसाठी निश्चित केलेल्या इनक्युबेशन सेंटर यांच्या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. जे उमेदवार तांत्रिक पात्रता फेरीत निवडले जातील त्यांनी अर्जाची हार्डकॉपी, आवश्यक सर्व कागदपत्रांसह स्वस्वाक्षरीत (Self-attested) करून अमृतच्या किंवा अमृतने योजनेसाठी निश्चित केलेल्या इनक्युबेशन सेंटरच्या कार्यालयास तांत्रिक फेरीच्या तारखेला जमा करणे बंधनकारक राहील.
लाभार्थी पात्रता निकष:
1. अर्जदार खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील जातीचा तरुण/तरुणी इच्छुक नवोद्योजक असणे आवश्यक आहे.
2. अर्जदाराच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. ८ लाख पेक्षा कमी असल्याबाबत प्राधिकृत अधिकारी यांचा उत्पन्नाचा वैध दाखला आवश्यक.
3. अर्जदार किमान १२ वी उत्तीर्ण असावा.
4. उमेदवाराचे वय ४५ पेक्षा जास्त नसावे.
5. अर्जदाराकडे स्वत:ची अशी नवीन व्यावसायिक कल्पना / तंत्रज्ञान असणे आवश्यक आहे.
6. योजनांतर्गत प्रोत्साहनपर अर्थसहाय्य कालावधीत उमेदवाराने उद्योजकीय आकांक्षेसाठी पूर्णवेळ पाठपुरावा करणे आवश्यक राहील.
7. अर्जदाराने याच प्रयोजनासाठी राज्य किंवा केंद्र सरकार यांच्या इतर समकक्ष अन्य कोणत्याही योजनांमधून रु.१० लाख (अक्षरी रुपये दहा लाख फक्त) पेक्षा जास्तीच्या अर्थसहाय्याचा लाभ घेतलेला नसावा.
8. उमेदवाराच्या आधार कार्ड व पॅनकार्डची स्वस्वाक्षरीत (Self-attested) प्रत.
9. उमेदवाराच्या वैयक्तिक आधार संलग्न बँक खात्याचा किंवा त्याच्या कंपनीच्या नावे असलेल्या बँक खात्याचा तपशील (बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक, IFSC कोड) देणे आवशयक. उमेदवाराने जर त्याच्या कंपनीच्या नावे असलेल्या बँक खात्याचे तपशील दिले असतील तर त्याप्रसंगी कंपनीच्या अन्य निदेशाकांकडून (Cofounders) “ना-हरकत प्रमाणपत्र” देणे बंधनकारक
लाभार्थी निवड प्रक्रिया:
1. अमृत संस्थेमार्फत व ज्या संस्थेकडून योजना राबविण्यात येईल त्यांचे मार्फत सदर योजनेची वर्तमानपत्रे व सामाजिक माध्यमातून व्यापक प्रसिद्धी करण्यात येईल.
2. अर्जदारांकडून अमृतच्या संकेतस्थळावर अथवा योजना राबविणाऱ्या संस्थेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येतील.
3. लाभार्थी निवडसाठी प्राप्त अर्जांची संबंधित संस्था व अमृत कार्यालयाकडून संयुक्त प्राथमिक छाननी करण्यात येईल.
4. त्यानंतर व्यवसायाच्या नवनवीन कल्पनांच्या तांत्रिक व व्यावहारिक दृष्ट्या योग्यायोग्यतेबाबत संस्थेच्या तज्ञांचे समितीद्वारे व अमृत संस्थेच्या प्रतिनिधी समवेत छाननी करण्यात येईल.
5. या संयुक्त तांत्रिक व व्यावहारिक छाननीत योग्य ठरणाऱ्या अर्जदारांचे अर्ज सर्व तपशिलासह व कागदपत्रांसह अमृतच्या छाननी निकषानुसार अंतिम छाननीसाठी अमृतच्या छाननी समितीच्या विचारार्थ ठेवण्यात येतील.
6. अमृतच्या निकषानुसार केवळ पात्र ठरणाऱ्या उमेदवारांचे अर्ज अमृत संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक यांचे मान्यतेने संबंधित संस्थेकडे शिफारस करण्यात येतील व निवड झालेल्या उमेदवारांना निवडलेल्या इनक्यूबेशन सेंटर येथे पुढील मार्गदर्शनार्थ प्रायोजित केले जाईल.
लाभाचे स्वरूप:
1. निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांचे प्रशिक्षण प्रगती अहवालाचे व संस्थेच्या शिफारसीचे आधारे प्रतिंमहा प्रोत्साहनपर अर्थसहाय्य रक्कम रु. २५,०००/- (अक्षरी रुपये पंचवीस हजार फक्त) फक्त एक वर्षासाठी प्रशिक्षण संस्थेमार्फत त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केले जाईल.
2. इन्क्यूबेशन सेंटर त्यांच्या कडून अमृतच्या लाभार्थ्यांना उपलब्ध होणारे तज्ञांचे मार्गदर्शन, तंत्रज्ञान, सॉफ्ट वेअर, मिटिंग हॉल, कार्यालयीन जागा, प्रशासकीय सहाय्य अशा विविध बाबींसाठी प्रति प्रशिक्षणार्थी प्रतिमहा रक्कम रु. ६०००/- (अक्षरी रुपये सहा हजार फक्त) अथवा सदर इनक्युबेशन सेंटर यांच्याकडून आकारली जाणारी प्रत्यक्ष रक्कम यापैकी जे कमी असेल ती रक्कम सदर सेंटरला थेट अदा करण्यात येईल.
3. इन्क्यूबेशन सेंटरकडून त्यांच्याकडील सेवांसाठी आकारली जात असलेली रक्कम रु. ६०००/- पेक्षा जास्त असल्यास उर्वरित रक्कम लाभार्थ्यांनी स्वत: संस्थेस भरावी.
नवोद्योजकांना प्रोत्साहनासाठी “इक्युबेशन सेंटर” योजना प्रश्नावली
1. योजनेसाठी अर्जदारांच्या नवकल्पना / नवतंत्रज्ञान याची खात्री / पडताळणी कशी केली जाईल?
अमृतच्या निकषांनुसार पात्र लाभार्थ्यांचे त्यांच्या नवव्यवसाय संकल्पनेसह ज्या संस्थेत त्यांना इक्युबेशनसाठी प्रशिक्षण घ्यायची इच्छा असेल त्यांना पाठविले जातील. अमृत व अमृत संस्थेने योजनेसाठी निश्चित केलेल्या इक्युबेशन सेंटर च्या संयुक्त छाननी समितीकडून अर्जदारांच्या नवकल्पना / नवतंत्रज्ञान यांच्या योग्यायोग्यतेची खात्री केल्यानंतर इक्युबेशन सेंटर च्या शिफारसीने उमेदवारांची निवड अंतिम केली जाईल.
2. इन्युबेशन सेंटर ची निवड लाभार्थ्याच्या पसंतीने राहील का?
लाभार्थ्याने निवडलेले नवीन प्रकल्प, त्याची संकल्पना, तंत्रज्ञान इ. व संबंधित इन्युबेशन सेंटर यांच्या उमेदवारांकडून प्रकल्पांबाबत अपेक्षा, साधन-सुविधा, तज्ञांची उपलब्धता इ. नुसार संयुक्त संमतीने निवड केली जाईल.
3. इन्युबेशन प्रशिक्षण मार्गदर्शन कालावधीत काही कारणाने खंड पडल्यास किंवा नोकरीची संधी मिळाल्यास लाभ नंतर पुढे सुरु राहील का?
योजनेच्या लाभार्थी निवड अटीनुसार योजनांतर्गत प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य कालावधीत उमेदवाराने उद्योजकीय आकांक्षेसाठी पूर्णवेळ पाठपुरावा करणे आवश्यक असल्याने कोणत्याही कारणाने खंड मान्य केला जाणार नाही, तसे घडल्यास योजनेचा लाभ आपोआप बंद केला जाईल.
4. इन्युबेशन प्रशिक्षण मार्गदर्शन कालावधीत संबंधित इन्युबेशन सेंटर मध्ये उपस्थिती बंधनकारक राहील का?
उमेदवार आपल्या गावी किंवा आपल्या सोयीच्या ठिकाणी राहून आपल्या कल्पनांवर काम करू शकेल पण इन्युबेशन प्रशिक्षण मार्गदर्शन कालावधीत संबंधित इन्युबेशन सेंटर मध्ये आवश्यकतेनुसार उपस्थिती बंधनकारक राहील. इन्युबेशन सेंटरने नियोजित केलेल्या सर्व उपक्रमांना / कार्यक्रमांना उपस्थिती बंधनकारक असेल. तसेच, इन्युबेशन सेंटरने वेळोवेळी मागितलेल्या अहवालांची पूर्तता करणे बंधामाकारक राहील.
5. निवड झालेल्या उमेदवाराला प्रत्यक्ष कल्पनेवर काही कारणास्तव (उच्च शिक्षण, अन्य नोकरी, व्यवसाय किंवा अन्य कुठलेही कारण) ठरवलेल्या योजनेनुसार काम करता येणे शक्य नसेल तर संबंधित कल्पनेवर सहयोगी निर्देशकांना (Cofounders) यांना योजनेचे लाभ मिळवून काम करता येईल का?
कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही कारणास्तव सदर लाभार्थी उमेद्वाराशिवाय अन्य कुणालाही सदर योजनेचा लाभ स्वीकारता येणार नाही. त्याप्रसंगी लाभ बंद करण्यात येईल.
6. निवड झालेल्या कल्पनेवर काम करताना त्या कल्पनेमध्ये / कल्पना राबविण्याच्या योजने मध्ये बदल करता येऊ शकेल का? त्याप्रसंगी लाभ बंद होईल का?
अमृत व अमृत संस्थेने योजनेसाठी निश्चित केलेल्या इन्युबेशन सेंटरच्या संयुक्त छाननी समितीच्या पूर्वसंमतीने त्या कल्पने मध्ये / कल्पना राबविण्याच्या योजने मध्ये बदल करता येऊ शकेल. पूर्वसंमतीशिवाय कुठलाही बदल ग्राह्य धरला जाणार नाही व योजनेचा लाभ बंद करण्यात येईल.
7. सदर कल्पना पूर्ण करण्यास योजनेच्या निश्चित कालावधीपेक्षा अधिकचा कालावधी लागत असेल तर काय करता येईल?
सदर प्रसंगी अमृत व अमृत संस्थेने योजनेसाठी निश्चित केलेल्या इन्युबेशन सेंटरच्या संयुक्त छाननी समितीच्या पूर्वसंमतीने अधिकच्या कालावधीचा विचार करता येऊ शकेल. त्यासंबंधीचे सर्व अधिकार अमृत व अमृत संस्थेने योजनेसाठी निश्चित केलेल्या इन्युबेशन सेंटरच्या संयुक्त छाननी समितीकडे राहतील.