योजनेचा उद्देश:
राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अमृतच्या लक्षित गटातील जातीच्या उमेदवारांना रोजगार निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे दृष्टीने स्वयंरोजगार प्रशिक्षण देणे. उद्दिष्ट पूर्तीसाठी खालील प्रमाणे कार्यक्रम घेण्यात येतील.
1. लाभार्थ्यांचे स्वयंरोजगारासाठी निवड आणि प्रशिक्षण.
2. व्यावसायिक उद्योजक तयार करण्यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन सर्वंकष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करणे.
3. या व्यावसायिकांच्या प्रशिक्षणासाठी अँप आणि प्रत्यक्ष उद्योग सुरु करण्यासाठी पूरक समन्वय यंत्रणा यांची उभारणी करणे.
4. व्यवसाय सुरु करण्यासाठी संबंधित लाथार्थ्यांकडून पूरक कागदपत्रांची पूर्तता करून घेणे.
5. व्यवसाय सुरु करण्यापूर्वी लाभार्थ्यांना व्यवसाय शिक्षणाकरता इंटर्नशिप उपलब्ध करून देणे.
6. व्यवसाय सुरु करण्याकरता कर्जाच्या उपलब्धतेसाठी सरकारी योजना, संस्था अगर बँक यांच्याशी समन्वय साधून कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शन व मदत करणे.
7. लाभार्थ्यांच्या व्यवसाय प्रसिद्धीसाठी त्यांना डिजिटल मार्केटिंगचे प्रशिक्षण देणे.
8. लाभार्थ्याने सुरु केलेल्या व्यवसायाच्या प्रगतीचा तीन महिने मागोवा घेणे आणि या कालावधीत समन्वयातुन त्यांच्या अडचणींचे निरसन करून देणे व व्यवसाय वृध्दी होत असल्याची खात्री करणे.
योजनेचा लक्षगट:
महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग / संस्था / महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अमृतच्या लक्षित गटातील जातीचे युवक, युवती जे सदर प्रशिक्षणासाठी घेण्यास इच्छुक आहेत असे उमेदवार .
लाभार्थी निवड निकष:
1. अमृत संस्थेच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषांची पूर्तता करणे बंधनकारक राहील.
2. लाभार्थ्यांचे वय १८ ते ६० वर्ष दरम्यान असावे
3. या योजनेतील लाभार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या सदर योजने सारख्या योजने मध्ये लाभ घेतलेला नसावा
लाभासाठी अर्ज करण्याची पध्दत:
योजनेसाठी अमृत संस्थेकडून व्यापक प्रसिद्धी देण्यात येईल. वर नमूद अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या अमृतच्या लक्षित लाभार्थी गटातील इच्छुक अर्जदारांनी विहीत नमुन्यामध्ये विहित मुदतीत या योजनेच्या अंमलबजावणी करिता नियुक्त केलेल्या संस्थेकडे ऑनलाईन/ वर नमूद अटी व शर्ती मध्ये पात्र ठरणारे लाभार्थी यांनी विहीत नमुन्यामध्ये या योजनेसाठी निश्चित करण्यात येणा-या एजन्सी कडे ऑफलाई/ ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील.
लाभार्थी निवड प्रक्रिया:
प्राप्त अर्जांची अमृतच्या छाननी निकषांनुसार अमृत व्दारा गठीत छाननी समितीव्दारा छाननी करण्यात येईल. त्यात पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची लाभार्थी म्हणून निवड करण्यात येईल. मा.व्यवस्थापकीय संचालक, अमृत यांचे मान्यतेने लाभार्थी यादी अंतिम करण्यात येईल.
योजने अंतर्गत लाभाचे स्वरूप:
या योजनेत लाभार्थ्यास कोणताही थेट लाभ अनुज्ञेय नाही. ज्या संस्थेमार्फत प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जाईल त्यांना प्रती प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण खर्च अनुज्ञेय राहील. यासह प्रशिक्षणाचे स्वरूप यामध्ये निर्देश केलेल्या सर्व उपक्रमांचा खर्च यांचा या मध्ये समावेश राहील.
आर्थिक विकासाकरीता स्वयंरोजगार प्रोत्साहन व प्रशिक्षण कार्यक्रम योजना FAQ
१. या योजनेचा लाभ कोणाला घेता येईल?
➢ अमृतच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषात बसणाऱ्या व ज्यांना उद्योग व्यवसायात स्वारस्य आहे असे उमेदवार सहभागी होवू शकतील
२. प्रशिक्षण कार्यक्रम कोठे राबविले जातील?
➢ या योजनेतील प्रशिक्षण कार्यक्रम प्रशिक्षणार्थींच्या संख्येनुरूप जिल्हा/तालुका स्तरावर राबविले जातील.
३. या प्रशिक्षणानंतर लाभार्थींना उद्योग व्यवसायास मदत केली जाईल का?
➢ या प्रशिक्षणानंतर लाभार्थींना उद्योग व्यवसाय सुरु करण्यास मार्गदर्शन केले जाईल.
४. लाभार्थींना उद्योगासाठी आर्थिक सहाय्य केले जाईल का?
➢ या योजनेत आर्थिक सहाय्याची तरतूद नाही. तथापि, अमृतच्या इतर योजनांतून लाभार्थींना प्राधान्याने लाभ देवून आर्थिक पाठबळ दिले जाईल.